Ad will apear here
Next
पं. बोरकर यांच्या ऑर्गनची भेट म्हणजे अमूल्य ठेवा
रत्नागिरीतील शिष्य मधुसूदन लेले यांनी जागवल्या आठवणी
रत्नागिरी : ‘गायकाची मैफल सजवण्यासाठी तुम्ही साथीला बसलेले असता. त्यात आपण किती वाजवतो, याचे प्रदर्शन करू नये. गायकाचा साथीदार साडेसातीचा असू नये. मैफल प्रेक्षकांना आवडली पाहिजे,’ अशी शिकवण पं. तुळशीदास बोरकर यांनी दिल्याची आठवण रत्नागिरीतील त्यांचे शिष्य हार्मोनियमवादक मधुसूदन लेले यांनी जागवली. पं. बोरकर यांनी स्वतः ४०-४५ वर्षे वापरलेल्या ऑर्गनची आपल्याला दिलेली भेट म्हणजे अमूल्य ठेवा असल्याचेही लेले यांनी सांगितले. ज्येष्ठ हार्मोनियमवादक पद्मश्री पं. बोरकर यांचे २८ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य लेले यांच्यासह रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.

‘मी त्यांच्याकडे २००६पासून शिकत होतो. मी त्यांच्याकडे शिकण्यासाठी दूरवरून जाणारा शिष्य असल्याने ते अधिक प्रेम करायचे. खरे तर माझ्यावर प्रेम करावे एवढे माझ्याकडे काही नाही. मी त्यांच्याकडून नम्रपणा शिकलो. त्यांनी स्वतः ४०-४५ वर्षे संगीतसाथीला वापरलेला ऑर्गन माझ्या २५व्या वाढदिवसाला (सहा डिसेंबर २००८) मला भेट दिला. त्यावर त्यांनी हजारो संगीत नाटके, छोटा गंधर्व, बालगंधर्व आणि पं. भीमसेनजींची अभंगवाणीही वाजवली आहे. त्यामुळे तो ठेवा अमूल्य आहे आणि ती भेट अविस्मरणीय आहे. तरीही मी त्यांना किंमत विचारली, तर ते म्हणाले, ‘या वाद्याला न्याय दे, उत्तम संगीतसाथ कर, म्हणजे मला किंमत मिळाल्यासारखेच आहे.’ काही वर्षांनी त्यांनी ‘माझी मुलगी सुस्थळी पडली’ असे मिश्किलपणे सांगून माझे कौतुक केले,’ अशी हृद्य आठवण लेले यांनी सांगितली.

‘पं. तुळशीदास बोरकर म्हणजे साक्षात गुरुमाउली. मैफलीत गातो तो गुरू, असे ते सांगत त्यांच्याकडे मी नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत यातील हार्मोनियम आणि ऑर्गनवादन शिकलो. चिजा, मांडणी, शब्दप्रधान वादन त्यांनी शिकवले. गायकाचा श्वास, जोडाक्षरे, एवढेच नव्हे, तर शब्दांमधील ऱ्हस्व, दीर्घसुद्धा वाजवता येतात, हे ते प्रात्यक्षिकासह दाखवत. नम्रपणा आणि अखंड शिक्षण या त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मी प्रवास करीन, हीच त्यांना खरी श्रद्धांजली,’ असे भावोत्कट उद्गार मधुसूदन लेले यांनी काढले.

पं. तुळशीदास बोरकर यांच्यासह शिष्य मधुसूदन लेले‘माणूस शेवटच्या श्वासापर्यंत शिकतो. लहान मूलसुद्धा शिकवते. परमेश्वरी कृपा क्षणार्धात होते. तोच तुम्हाला अडचणीत निभावून नेतो. सद्गुरूंवर विश्वास ठेवा. कुलदेवतेची सेवा करा. कुणाला दुखवू नका, कमी लेखू नका. वाईट म्हणू नका. एखाद्याबद्दल वाईट बोलण्यापेक्षा लांब राहा. काळ तुम्हाला शिकवेल,’ अशी पं. बोरकर यांची शिकवण असल्याचे लेले म्हणाले.

‘त्यांचा स्वभाव मिश्किल व विनोदी. लहान मुलांमध्येसुद्धा ते सहज रमायचे. त्यांची चेष्टा-मस्करी करायचे. पद्मश्री असले तरी त्यांची राहणी साधीच असायची,’ अशा काही आठवणीही लेले यांनी सांगितल्या.

सहकलाकाराला प्रेमळ वागणूक हे वैशिष्ट्य : हेरंब जोगळेकर
‘पं. तुळशीदास बोरकर मोठे कलाकार असले, तरी त्यांनी तसा डामडौल कधी मिरवला नाही. मनाची, कलेची श्रीमंती दाखवली. त्यांनी वयाने लहान असलेल्या सहकलाकारांनाही कायम प्रेमळ वागणूक दिली. कधीही अरे-तुरे केले नाही,’ अशी आठवण पं. बोरकर यांना साथसंगत केलेले रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी सांगितली. जोगळेकर कुटुंबीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

हेरंब जोगळेकर‘रत्नागिरीत बुवांचे हार्मोनियम व ऑर्गन सोलो वादनाचे कार्यक्रम झाले. त्या वेळी ते आठ दिवस आमच्याकडे वास्तव्याला होते. त्यानंतर ते जेव्हा जेव्हा रत्नागिरीत येत, तेव्हा ते आत्मीयतेने आमच्याकडे जेवायला यायचे. त्यांच्या एका ऑडिओ सीडीसाठीही तबलासाथ करण्याचे भाग्य मला लाभले. ही सीडी लवकरच येणार आहे.’ एकदा बुवा चिपळूणला स्वामी समर्थांच्या मठात आल्यावर त्यांनी अचानक फोन केल्यावर आपण बाहेर असतानाही बुवांनी आवर्जून बोलावल्यामुळे तिथून साथीला गेल्याची आठवणही जोगळेकर यांनी सांगितली.

‘माझ्या मुलाचा ऑर्गनवादनाचा पहिला व्हिडिओ पाहून, त्यांनी मला फोन केला. मुलामध्ये कलेची चुणूक आहे. त्याची कला जपण्याचे काम आई-वडिलांचे आहे. अति कौतुकाने हुरळून न जाता त्याला संयम शिकवला पाहिजे,’ असे त्यांनी आपुलकीने आवर्जून सांगितल्याचे हेरंब जोगळेकर म्हणाले.

बुवांचा रत्नागिरीतील कलाकारांनी सत्कार केल्याची आणि त्यानंतर काही महिन्यांतच बुवांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची आठवणही जोगळेकर यांनी सांगितली. 

(आडिवरे येथील ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते यांनी जागवलेल्या पं. बोरकर यांच्याविषयीच्या आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZFYBS
Similar Posts
‘गुरुजींचा ऑर्गन वाजला, की गायक गातो असे वाटायचे’ रत्नागिरी : ‘पं. तुळशीदास बोरकर म्हणजे हार्मोनियम आणि ऑर्गन या वाद्यांचे भीष्माचार्य होते. गुरुजींचा ऑर्गन वाजला, की साक्षात गायक गातो असे वाटायचे. गुरुजी केवळ वादकच नव्हते, तर वाद्यातील तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम माहिती होती. ते स्वतः उत्तम ट्युनिंग करायचे. त्यांच्या निधनामुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक
रत्नागिरीत संवादिनीवादन कार्यशाळा रत्नागिरी : येथील स्वरनिनाद संगीत अ‍ॅकॅडमी आणि ओम साई मित्रमंडळा यांच्या वतीने युवापिढीतील प्रसिद्ध संवादिनीवादक तन्मय देवचके यांची संवादिनीवादनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
एकल वाद्यवादन स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद; ओम साई मित्रमंडळातर्फे आयोजन रत्नागिरी : साळवी स्टॉप-नाचणे रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या सभागृहात नुकतीच एकल (सोलो) वाद्यवादन स्पर्धा उत्साहात पार पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने... ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने, डॉ. काशिनाथ घाणेकर यांची कलेवर असणारी निष्ठा दर्शविणारी एक हृद्य आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे अॅड. धनंजय भावे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language